हम्पटा पास : पहिला हिमालयीन ट्रेक

        ट्रेक विषयी : साधारण दोन वर्षापासून हिमालयात ट्रेकींगला जायच असा  प्लान डोक्यात होता पण तो प्लानच रहात होता.यावेळेस थेट बुकिंग केल युथ होस्टेल सोबत सप्टेंबरच रूपकुंड साठी.पण नशीब  रूपकुंड ट्रेक  रद्द झाला.मग  हम्पटा पास फायनल केला आणि लागलो तयारीला. शेवटी सर्व तयारी करून मी एकटा निघालो.मुंबई ते दिल्ली विमानाने पोहोचलो तेव्हा दिल्लीत ४:३० वाजले होते.अहमदाबादचे दोन  मित्रही बरोबर वेळेत आले.आम्ही तिघेजण मेट्रोने ISBT काश्मिरी गेटला गेलो. रात्रीच्या ९:३० ची वल्वो बस दिल्ली ते कुल्लूचे  तिकीट  काढले.बस वेळेत निघाली ,१५ मैल बेस कॅम्पला पोहचायला  १५ तास लागले  म्हणजे दुपारी १२ वाजता.
     
YHA कुल्लूचा बेस कॅम्प परिसर खूप सुंदर आहे.तिथे ८ ते १० तंबू होते, आम्हाला एका तंबूत जागा दिली.रात्रीचा प्रवासामुळे शरीर थकले होते  आणि भूक पण लागली होती.तिथे गेल्यावर नुकतेच झाडावरून तोडलेले  अतिशय गोड व रसदार  सफरचंद एकाने आम्हाला  दिले. चला स्वागत तर छान झाल .
         दुपारी मस्त जेवण झाले.तिथून पढे पत्लीकुल गाव आहे.शेवटची खरेदी काही मित्रांना करायची होती त्यासाठी  आम्ही ५-६ जण चालत निघलो.रोडच्या दोन्ही बाजूनी बऱ्यापैकी दुकान होती.एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असाव अस मार्केट होत.टिफिन बॉक्स,टोपी हातमोजे ई समान खरेदी करून परत चालत आम्ही बेस कॅम्प वर आलो.


     चहा घेतला .त्यावेळेस सर्व  ट्रेकर्स जमा झाले होते. एकूण २५ जण महाराष्ट्र ,गुजरात, तामिळनाडू,केरळ,कर्नाटक ई राज्यातून आले  होते .सकाळची आंघोळ बाकी होती,आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा इतक्या थंड पाण्यात मी आंघोळ केली.जेव्हा पाणी अंगावर घेतले तेव्हा असे वाटले की माझा श्वास थांबलाय पण केली पूर्ण आंघोळ.
 
            पहाडी भागात लवकर अंधार पडतो.संध्यकाळी ६ वाजता थंडी अचानक वाढली,मग गरम कपडे घातले  व जेवण केले.स्वताचा टिफीन धुतला. त्यावेळेस मनात् विचार आला की स्वच्छता  किती महत्वाची मनाची,शरीराची. पुढे ८ ते १० दिवस स्वताची काम स्वतःला करावी लागेल. रात्री तंबूत  आलो व लगेच झोप लागली. क्रमश 

Comments